ऑपरेशन थिएटर पलीकडचा सर्जन

शास्त्राक्रीयागाराचा चा लाल दिवा लागलेला आहे. बाहेर चिंताग्रस्त नातेवाईक बसलेले आहेत व अचानक दिवा बंद होतो, दार उघडते व हिरवा लांब झगा, टोपी व नाकपट्टी घातलेला इसम बाहेर येतो नाकपट्टी काढून उद्गारतो ‘काँग्रॅच्युलेशन्स द ऑपरेशन इस सक्सेसफुल’. हे झाले चित्रपटांतील वर्णन पण प्रत्यक्षात सर्जन फक्त शास्त्राक्रीयेपुरता मर्यादित नसून त्याआधी व त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी त्याला कराव्या लागतात. त्यावर थोडासा प्रकाश टाकायचा प्रयत्न या लेखातून द्यावयाचा आहे.

एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या संमतीने जखम करून त्या व्यक्तीच्या भल्यासाठी एखाद्या अवयवाची रचना किंवा कार्य बदलणे किंवा अवयव काढणे किंवा जखमेमुळे झालेल्या परिणामांची परिमिती आटोक्यात ठेवणे याची क्रिया म्हणजे शस्त्रक्रिया. पण दुसऱ्याला जाणीवपूर्वक जखम करणे म्हणजे फार हिमतीचे काम! पण त्याबरोबर पूर्वाभ्यास व होणाऱ्या परिणामांची व्याप्ती आटोक्यात ठेवण्याची तारेवरची कसरत पण करावी लागते.

ही सर्व प्रक्रिया एका तक्त्यावर मांडून दाखवलेली आहे. तो तक्ता आपण नजरेखालून घालून पहा.

आपल्याला एक गोष्ट जाणवेल की या प्रक्रियेत त्याच गोष्टी परत परत कराव्या लागतात व काही महत्त्वाच्या क्षणी निर्णय घ्यावे लागतात.

एखादी गोष्ट पहिल्यांदा करताना फार उत्सुकता असते, पण दुसऱ्यांदा करताना त्याचे दोन प्रकार असतात.
१. दुसऱ्यांदा पहिल्या यशाने मूठभर मांस चढले असल्याने थोडा वाढीव उत्साह असतो किंवा चुकून पहिला प्रयत्न अनपेक्षित असेल तर दुसऱ्यांदा यश गावसण्यासाठी कंबर कसून केलेले प्रयत्न असतात. २. काही गोष्टी अशा असतात की त्या त्वरित फळ देत नाहीत पण तरीही त्या सारख्या सारख्या कराव्याच लागतात. अशा गोष्टी दुसऱ्या तिसऱ्या खेपेस कंटाळवाण्या वाटू शकतात. पण हा कंटाळा कटाक्षाने टाळणे गरजेचे असते. सर्जरी च्या क्षेत्रात असेच आहे ८० टक्के पेक्षा जास्त गोष्टी ह्या दुसऱ्या प्रकारात मोडतात.

प्रसंगानुरूप निर्णय घेण्यासाठी असामान्य बुद्धिमत्ता हवीच असे नाही पण साधारण पेक्षा अधिक निर्णयक्षमता व मनाची एकाग्रता मात्र नक्कीच लागते.

सर्जन पेशंट पाहतो म्हणजे नक्की काय?

सर्जन व पेशंट यांच्या संवादाची सुरवात हिस्टरी घेण्याने होते. हिस्टरी घेणे हा बराचसा भाग एखादी प्रश्नपत्रिका दिली व काय काय होते लिहा म्हणून सांगितले तरी होण्यासारखा असतो; पण त्यात हिस्टरी पेक्षा पलीकडचे बरेच काही असते. डॉक्टर व पेशंट मध्ये विश्वास निर्माण करण्यास हाच संवाद महत्वाचा असतो. पेशंटला पाहता क्षणी सर्जनच्या डोक्यात नेमका काय त्रास असेल याबद्दल चक्रे फिरू लागतात. हिस्टरी घेताना पेशंटला हा विश्वास देणे फार गरचेचे असते कि तुझ्या त्रासाची मला कल्पना घेणे फार गरजेचे आहे व पूर्णपणे कोणता किंतु परंतु न बाळगता तू माझयापुढे व्यक्त होऊ शकतो. बऱ्याच वेळा आपणास हा अनुभव आला असेल की फार प्रश्नांची सरबत्ती न करता डॉक्टरांनी एखाद दुसराच प्रश्न विचारला व तपासणी चालू केली. कारण अनुभवातून प्रत्येक डॉक्टर हे शिकत जात असतो की नेमकं काय विचारायचे. विचारण्यासारख्या सतराशे साठ गोष्टी असतात पण नेमक्या कोणत्या विचारायच्या ही पण एक अनुभवसिद्ध कला आहे. पेशंटची सांगितलेली प्रत्येक गोष्ट जाणून त्याचा किती संबंध व महत्त्व डायग्नोसिसशी लावणे यावर आमचा कस लागत असतो.

या नंतर पेशंटची शारीरिक तपासणी होते व आम्ही आमच्या मनात काही आडाखे बांधलेले असतात त्यांची सांगड ह्या तपासणीत काय निघाले याच्याशी घालून काही तात्पुरते निदान ( त्याला १,२ पर्यायी निदाने देखील असतात) ठरवले जाते.
आता पेशंटला पॅथॉलॉजी, +/- रेडियोलॉजी परीक्षा सुचवली जाते. गेल्या शतकात या दोन्ही बाबतीत विज्ञानाने फार मोठी क्रांती घडवून आणली आहे. पूर्वी जेव्हा सोनोग्राफी व रक्तपरीक्षा नव्हत्या तेव्हा बरीच ऑपरेशन्स केवळ पेशंटला काय आजार आहे हे कळण्यासाठी व्हावयाची आता सुदैवाने त्यांची संख्या कमी झालेली आहे. उलट सध्या आता अशी स्थिती आहे की विविध प्रकारच्या अनेक टेस्ट आपणास उपलब्ध आहेत.

सिटी स्कॅन व एम आर आय या दोन तपासण्या म्हणजे विज्ञानाची कमाल आहेत. त्यात बरीच माहिती ऑपरेशन आधी मिळते जसे कि समजा एक कॅन्सरची गाठ आहे तर, नेमकं आकारमान किती, अन्यत्र कुठे दुसरी गाठ आहे का, जी गाठ आहे तिचा एखादा महत्वाच्या अवयव/ किंवा रक्तवाहिनीशी किती जवळचा संपर्क आहे आणि अशी बरीच माहिती ऑपरेशन आधी मिळते त्यामुळे शस्त्रक्रियेचा नेमकेपणा सुधारतो.
या क्षणी रोगनिदान बव्हंशी केसेस मध्ये झालेले असते.

या टप्प्यापर्यंत बहुतेक वेळेस निदान लागलेले असते व पुढील नियोजनासाठी विचार चालू होतात. उपचार अनेकविध असतात त्यातले नेमके काय करायचे नुसती औषधे पुरेशी आहेत की ऑपरेशन पण गरजेचे आहे?
इंजेक्शने किंवा गोळ्या हा एक आणि ऑपरेशन हा दुसरा हे पूर्वी दोन ठोकळ प्रकार होते पण गेल्या काही वर्षांत ऑपरेशन न करता पण काही उपाय असतात जे रेडिओलॉजिस्ट सोनोग्राफी, अँजिओग्राफी किंवा सिटीस्कॅन च्या मदतीने केले जातात तयार झाले आहेत त्यांना इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी उपाय म्हणतात. ऑपरेशन म्हणजे चिरफाड हे झाले जुने समीकरण पण आता लॅपरोस्कोपी व एन्डोस्कोपी या तंत्रांनी कमीत कमी चिरफाड / काहीही चिरफाड न करता देखील शस्त्रक्रिया करता येते.

झालेले निदान पेशंटला सांगणे हे मोठे जिकीरीचे काम आहे. प्रत्येक पेशंटचा स्वाभाविक अधिकार आहे की त्याला काय झाले आहे याची पूर्ण माहिती असणे. पण जेंव्हा निदान एखाद्या असाध्य रोगाचे असते तेंव्हा नातेवाईकांचा यातील सहभाग फार महत्वाचा ठरतो.

सर्जरी करावी का नको ?: फायदा व जोखीम यांचे संतुलन

शत्रक्रिया करण्याचा निर्णय घेणे एका तराजूप्रमाणे आहे. एका पारड्यात शस्त्रक्रियेने होणारा फायदा असतो तर दुसऱ्या पारड्यात पेशंटला सर्जरीच्या जोखमीच विचार असतो आणि जोपर्यंत फायद्याचे पारडे खाली होत नाही तोपर्यंत सर्जरी सुचवली जात नाही.
यात दोन गोष्टी स्पष्ट होतायत. एक म्हणजे जोखीम फक्त शस्त्रक्रियेची नसून भुलेची पण असते त्यासाठी पेशंट भूलतज्ज्ञांना दाखवला जातो, तसेच निवडक बाबतीत फिजिशियन ना दाखवला जातो, ते पेशंट तपासतात आवश्यक अधिक चाचण्या करतात व जोखमीच अंदाज ठरतो.
दुसरी बऱ्याच वेळा पेशंट विचारतात तुम्ही याच निदानासाठी दुसर्या पेशंटला शस्त्रक्रिया केली होती व आम्हाला नाही म्हणताय याचे कारण हे असते की तुमच्या बाबतीत हे पारडे शास्त्रक्रीयेकडे पूर्ण झुकले नव्हते. याच वेळेला हा निर्णय हि होऊ शकतो की धोके अधिक असल्याने ज्या ठिकाणी अश्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया नियमीतपणे होतात किंवा त्यासाठी आवश्यक सोय आहे अश्या ठिकाणी पाठवणे.

डॉक्टर पेशंट सुसंवाद का महत्त्वाचा?

आता शस्त्रक्रिया ठरली आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संमतीपत्र. ज्यात पेशंट व पेशंटचा निकटवर्ती नातेवाईक यांना शास्त्रक्रियेविशयी व भूलेविषयी विस्तृतपणे सांगितले जाते, त्यातील संभाव्य धोके अवगत करून दिले जातात व त्यांच्या पूर्ण संमतीनेच सर्जरी होऊ शकते.
प्रत्यक्ष शस्त्रक्रिया या लेखाचा विषय नसला तरी नमूद करू इच्छितो की शस्त्रक्रिया एक गुंतागुंतीची कला आहे त्यात आम्ही पेशंटच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देतो त्यासाठी आम्हाला (सर्जन,भूलतज्ञ,नर्सेस,तंत्रज्ञ व ईतर कामगार) एकसंघपणे काम करावे लागते. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक चेकलिस्ट बनवली असून त्याचा (प्रत्येक ठिकाणची स्वतःची एक पर्यायी पद्धत असते) वापर आम्ही करतो.
लाल दिवा बंद झाला आणि ऑपरेशन सक्सेसफुल म्हणण्याने काम संपत नाही तर येथून पुढे जोपर्यंत पेशंट डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत रोज पेशंटला पाहणे त्याला काय त्रास होतोय, त्याचे शारीरिक तपासणीचे निष्कर्ष काय आहेत, काय तपासण्या कराव्या लागू शकतात याचे चक्र पुन्हा फिरू लागते. सुदैवाने सर्जरी व त्यातील जोखीम कमी होत चाललीये पण शून्य करणे सद्यमितीला अशक्य आहे. त्यामुळे जखमेतील इन्फेक्शन पासून न्युमोनिया पर्यंत अनेक गोष्टींचा विचार कायम करावा लागतो. क्वचित प्रसंगी रक्तातील गुठळी फुफ्फुसाच्या धमनीत अडकणे, हृदयविकाराचा झटका येणे असे जीवघेणे प्रसंगही उद्भवतात. परत शस्त्रक्रिया करण्याचा प्रसंग उद्भवतो किंवा वरिष्ठ संस्थेत पाठवावे लागू शकते. नवीन प्रतिजैविके निघाली आहेत तेवढेच चिवट जीवाणू होत आहेत त्यामुळे प्रतीजैविकेही विचारपूर्वक वापरावी लागतायत. या सर्व प्रक्रियेत डॉक्टर व पेशंट व त्यांचे नातेवाईक यांच्यातील सुसंवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सारांश

  • शस्त्रक्रिया हे डॉक्टरांच्या भात्यातील गंभीरपणे हाताळण्याचे शस्त्र आहे.
  • ती एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. १ नंतर २ नंतर ३ असा सरळसोट क्रम दर वेळेलाच असेल असे नाही बऱ्याच ठिकाणी दोन मार्ग असतात जेथे निर्णयक्षमता पणास लागते.
  • यात त्याच त्याच गोष्टी न थकता पुनःपुन्हा कराव्या लागतात म्हणून फार चिकाटी व मेहनत लागते
  • शस्त्रक्रिया हा एकपात्री प्रयोग नाही तर तो पूर्ण समूहाने एकत्र घडवलेला अविष्कार आहे. संघभावना व आपल्या संघातील सर्वाना योग्य वागणूक हे चांगल्या सर्जनचे लक्षण आहे.
  • वरिष्ठ संस्थेत इलाजासाठी पाठवणे म्हणजे जबाबदारी ढकलणे होत नाही त्यात पेशंटचे हित असते म्हणूनच हा निर्णय होतो.
  • पेशंट व पेशंटचे नातेवाईक पण या सर्व घडामोडींचे महत्वाचे घटक आहेत त्याची जबाबदारी असणे अपेक्षित आहे.

डॉ. सुधन्वा रा. पाठक
जठरांत्र व यकृत,स्वादुपिंड,पित्तसंस्था शल्यचिकित्सक
पाठक हॉस्पिटल
मिरज

Posted by pathaksudh

2 comments

Gouri khadilkar joshi

मस्त लिहितोस सुध्दा. Great . Would like to follow blogs

pathaksudh

thanks.

Leave a Reply