मिरज : दि. ३० नोव्हेंबर
आज येथे पाठक ट्रस्ट तर्फे ट्रस्ट चे संस्थापक, मिरजेचे माजी आमदार व निष्णात धन्वंतरी कै. डॉ. न. रा. पाठक यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता डॉक्टरांच्या मिरज मार्केट परिसरात असणाऱ्या पुतळ्याचे पूजन त्यांचे सहकारी व ज्येष्ठ समाजकारणी श्री युसुफ मुल्ला यांचे हस्ते झाले. या प्रसंगी समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पाठक अनाथाश्रम व वृद्धाश्रमातील प्रवेशित उपस्थित होते.
पाठक हॉस्पिटल येथे हॉस्पिटल तर्फे स्मृतिदिनानिमित्त दर वर्षी प्रमाणे ऐच्छिक रक्तदान शिबीर भरवण्यात आले होते. त्यामध्ये ४० जणांनी रक्तदान केले. रक्तसंकलनाचे काम श्री वसंतदादा पाटील रक्तपेढी मिरज तर्फे करण्यात आले. पाठक अनाथाश्रामाचे अधीक्षक श्री. अशोक कोळसे यांचेपण शिबिरास सहकार्य लाभले .
सायंकाळी ६ वाजता मुक्तांगण सभागृह, खरे मंदिर येथे पाठक ट्रस्ट चा वार्षिक अहवाल प्रकाशन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी मिरजेचे माजी आमदार श्री. शरद पाटील होते, तर प्रमुख पाहुणे विट्याचे श्री. अभय भंडारी होते. तसेच माजी आमदार हफिजाभाई धत्तुरे , डॉ न. रा. पाठकांचे चरित्रकार श्री. प्रकाश पाठक हे देखील उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मुकुंदराव पाठक यांनी प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर, डॉक्टर न. रा. पाठक यांचे प्रतिमापूजन, अनाथाश्रमातील मुलांचे स्वागतगीत, अहवाल सालातील देणगीदारांचा गौरव व कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या जुन्या पिढीतील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार हे कार्यक्रम झाले. ट्रस्टचे कार्यवाह डॉ. बी. टी. कुरणे यांनी गेल्या वर्षातील ट्रस्टच्या कामाचा अहवाल सादर केला तसेच अहवाल सालात देवाज्ञा झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य असे की दर वर्षी या कार्यक्रमाचा भाग महणून मुख्य पाहुण्यांचे समाजप्रबोधनपर व्याख्यान होते. श्री. अभय भंडारी ‘या देशाचे होणार काय?’ या विषयावर अत्यंत परखड व निर्भीडपणे बोलले. त्यांनी श्रोत्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले व देशासाठी आपण झटले पाहिजे हे ब्रीद त्यांच्या मनावर बिंबवले. श्री. शरद पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. न. रा. पाठक यांच्या कामाचे महत्त्व समजावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे सहकार्यवाह श्रीकांत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी डॉ. कुरणे यांनी सर्वांचे आभार मानले. उपस्थितांमध्ये अनेक डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार होते. कार्यक्रमानंतर दत्त भोजनालयाचे श्री नाईक बंधूच्या तर्फे चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती व पारगावहून आलेल्या लोकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
Leave a Reply