मराठी

डॉ. एन. आर. पाठक यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन १९४५ साली वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. त्यांनतर २ ऑक्टोबर १९४७ रोजी त्यांनी एका नवजात परंतु अनाथ मुलास आश्रय दिला. तेव्हापासून सामाजिक तळमळ व बांधिलकीतून समाजकार्य करणाऱ्या वृत्तीच्या महान कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. १९४७ ते १९८४ या दीर्घ कालावधीत ही संस्था डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्येच कार्यरत होती. कायमच ३५ ते ४० मुले या ठिकाणी आश्रयाला असायची. जन्मापासून आलेल्या अनाथ व समाजाने अव्हेरलेल्या मुलांचा स्विकार करुन त्यांचा सांभाळ केला. त्यांनतर त्यांच्या शिक्षणाची व पर्यायाने नोकरीची व्यवस्था करुन स्वावलंबी बनविले. त्याबरोबरच आलेल्या नवजात मुलींचे संगोपन करुन त्यांना योग्य असे शिक्षण देऊन त्यांचे लग्न करुन दिले. तसेच निराधार, परित्यक्त्या व पिडीत महिलांना संस्थेत आणून त्यांचे पूनर्वसन करून स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना आधार देऊन मोफत दाई ट्रेनिंग कोर्स सुरु केला. कार्यविस्तार झाल्यावर या संस्थेचे त्यांनी मोठ्या प्रयासाने व कष्टाने ब्राह्मणपुरीतील रानडे वाड्यामध्ये स्थलांतर केले.

या संस्थेने आधार दिल्यामुळे आजअखेर अनेक मुले-मुली आश्रयाला राहून-शिकून स्वावलंबी बनलेली आहेत. या पैकी बरीचशी मुले मोठ्या पदावर कार्यरत असुन प्रतिष्ठेचे आयुष्य जगत आहेत. अनाथ अर्भकांना व निराधार स्त्रियांना आईचे प्रेम व वडिलांचा आधार देऊन समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्याचे अतिशय अवघड कार्य डॉ. न. रा. पाठक व मातोश्री सीताबाई पाठक यांनी केले आहे.

प्राथमिक अवस्थेत या मुलांचे संगोपन व देखभालीचा खर्च डॉ. पाठक स्वतःच्या मिळकतीतून करीत असत. त्यानंतर आजपर्यंत पाठक कुटुंबियांची या संस्थेला सतत मदत सुरु आहे. नंतरच्या काळात २० मुलांना दरडोई दरमहा रु. १५ प्रमाणे, सरकारी अनुदान मिळत होते. आता तेच अनुदान वाढत जाऊन दरडोई रु. २,००० प्रमाणे प्रतिमाह अनुदान मिळते. परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे या तुटपुंज्या अनुदानावर खर्च भागणे शक्य होत नाही.

अगदी सुरूवातीपासून समाजातील दानशूर व सामाजिक हीत सांभाळणाऱ्या देणगीदारांवर ही संस्था अवलंबून आहे. नेहमीच वैयक्तिक, सांधिक व समाजसेवी संस्थांकडून, मासिक, प्रसंगानुरुप किंवा कायम स्वरुपी रोख किंवा वस्तुरुपाने संस्थेस मदत मिळत असते. या मदतीशिवाय केवळ अनुदानावर संस्था चालविणे कदापीही शक्य नाही. अशाप्रकारे कायमच मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्वांचा उल्लेख करणे येथे शक्य नाही. ही संस्था अशा सर्वच हितचिंतक, देणगीदार व मदतगार व्यक्तींचे कायमच मनापासून ऋणी आहे.

डॉक्टर पाठकांनी सुरू केलेल्या या कार्यावर समाजाची नितांत श्रध्दा आहे, याचा पदोपदी अनुभव येतो. म्हणून या कार्याला कायमच लोकाश्रय लाभलेला आहे. सुरुवातीच्या ४० वर्षांमध्ये डॉ. एन. आर. पाठक, मातोश्री सीताबाई पाठक, बंधू श्री. बी. आर. पाठक व त्यांच्या बरोबरीने कार्य करणारे मित्र, सहकारी व विश्वस्त या सर्वांनी आपल्या दानाचे बहुमोल योगदान या महान कार्यास दिले आहे. त्यानंतर त्यांचे सुपुत्र डॉ. रा. न. उर्फ मुकुंदराव पाठक, पत्नी डॉ. सौ. अंजली पाठक व श्वषूर कै. श्री. श्री. श्री. पळसुले यांनी हे कार्य त्याच धडाडीने व समर्थपणे पेललेले आहे.

अनाथाश्रम, महिलाश्रम याबरोबरच आता काळाची गरज बनलेल्या वृध्दाश्रमाची त्यांनी १९९० साली सुरुवात केली. केवळ अपत्यहिन व निराधार स्त्री-पुरुषांना माफक मोबदल्यात या आश्रमात आश्रय दिला जातो. येथील ब्राह्मणपुरीतील गद्रे वाड्यामध्ये हा आश्रम कार्यरत आहे. अनेक वयोवृध्द स्त्री-पुरुष या संस्थेमुळे आपले उर्वरीत निवृत्त आयुष्य सुखासमाधानाने वृध्दाश्रमामध्ये व्यतीत करित आहेत.

अनाथाश्रमात एकावेळी २० ते ३० मुले-मुली आश्रयास असतात. तर वृध्दाश्रमात २५-३० स्वी-पुरुष वास्तव्यास असतात.

Scroll to Top