३० नोव्हेंबर २०२१:
मिरज
दर वर्षी प्रमाणे स्मृतिदिनाची सुरवात कै. डॉ. न. रा. पाठक यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. सकाळी ८ वा झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री. मोहन वाटवे यांच्या हस्ते डॉक्टरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या कार्यक्रमास पाठक अनाथाश्रमाचे ट्रस्टी, अधीक्षक, समाजसेविका व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. त्यासोबत माजी व आजी प्रवेशित ,अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मिरज ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. सुधीर नाईक व श्री. मोहन वाटवे यांच्या पुढाकारामुळे पुतळा सुशोभीकरणाच्या कामास लवकरच सुरुवात होईल अशी आशा वाटते. कै. डॉ. पाठक हे लोकनेते होते. मिरजेच्या नागरिकांनी त्यांच्यावर अपार प्रेम केले व अपक्ष असून सुद्धा आमदार म्हणून निवडून दिले. त्यांची स्मृती सदैव जतन व्हावी म्हणून गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सदर पुतळा हा तत्कालीन मिरज नागरपालिके तर्फे १९८६ साली उभारण्यात आला. पुतळ्याचे अनावरणास डॉ. डी. वाय. पाटील, आमदार मोहनराव शिंदे, श्री. दादासाहेब जामदार, नगराध्यक्ष बाळासाहेब कदम व प्राध्यापक गुरुनाथ मुंगळे उपस्थित होते. त्यास आता ३५ वर्षे झाली आहेत त्यामुळे पुतळ्याचे सुशोभीकरण व निगा राखण्याची सोय करणे गरजेचे आहे. कोविड परिस्थितीमुळे सदर कामास महापालिकेची परवानगी मिळूनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही ही खंत आहे पण नक्कीच पुढील काही काळात हे काम तातडीने होईल अशी आशा बाळगुयात.
सकाळी १० वाजता डॉ. कैलास साळुंखे व डॉ. आनंदराव यादव यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिरात २७ जणांनी ऐच्छिक रक्तदान केले. त्यामध्ये ४ महिला रक्तदात्या व ३ प्रथम रक्तदान करणारे दाते होते. रक्तसंकलन श्री वसंतदादा पाटील रक्तकेंद्राने केले.
दर तीस नोव्हेंबर ला खरे मंदिर येथे व्याख्यान होते व संस्थेचा अहवाल प्रकाशित होतो तसेच संस्थेस मदत करणाऱ्यांचा सत्कार होतो पण याखेपेस सलग दुसऱ्या वर्षी कोविड परिस्थिती मुळे सार्वजनिक कार्यक्रम घेता आला नाही.
३० नोव्हेंबर जसा डॉक्टरांचा स्मृतिदिन आहे तसा तो वृद्धाश्रमाचा वर्धापन दिन देखील आहे. त्याचे औचित्य साधून संस्थेतील सर्व प्रवेशित आणि ट्रस्टी व पदाधिकारी संध्याकाळी एकत्र आले. त्यावेळेस संस्थेचे सल्लागार ऍड. सतीश पटेल उपस्थित होते. त्यावेळी आजी आजोबाना उद्घाटन सोहळ्याची चित्रफीत दाखवण्यात आली. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. रा. न. पाठक यांनी वृद्धाश्रमाची स्थापना ते आतापर्यंतची वाटचाल कशी झाली याबाबत माहिती दिली व वृद्धाश्रम सुरु करण्यामागे त्यांची नेमकी वैचारिक भूमिका कोणती होती त्याची पण सविस्तर कल्पना दिली.
कु. सावित्री व चि. सत्यजित पाठक यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले. वृद्धाश्रमातील आजीनी सुगम गायन सादर केले.
डॉ. श्रीकांत कुलकर्णी, सहकार्यवाह व खजिनदार , पाठक ट्रस्ट यांनी अहवाल वाचन व प्रकाशन केले.
त्यानंतर ऍड. सतीश पटेल यांनी आपले मनोगत मांडले.
सगळ्यात शेवटी कार्यवाह डॉ. बी. टी. कुरणे यांनी आभारप्रदर्शन केले.
डॉ. रा. न. पाठक यांनी याखेपेस केलेले भाषण
Leave a Reply