कै. डॉ. एन. आर. पाठक यांचा ३७वा स्मृतिदिन

३० नोव्हेंबर २०२२

आज आमच्या संस्थेचे संस्थापक, मिरजेचे माजी आमदार व लोकनेते  कै. डॉ. एन. आर. पाठक यांचा ३७ वा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी पाळला गेला.

सकाळी आठ वाजता लक्ष्मी मार्केट येथील डॉक्टरांच्या पुतळ्यास अभिवादनाने कार्यक्रमांची सुरुवात झाली. गेली अनेक वर्षे डॉ. संतोष व डॉ. सौ. मंजुश्री कुलकर्णी हे उभयता बालरोगतज्ज्ञ आपल्या संस्थेस मदत करतात. त्यांच्या शुभ हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. त्यावेळी डॉक्टरांच्या वर प्रेम करणारे मिरजेतील अनेक नागरिक उपस्थित होते तसेच संस्थेतील माजी व आजी प्रवेशित, राजकारण व समाजकारण यात अग्रेसर मंडळी, कार्यकर्ते तसेच ट्रस्टी व कार्यकारी मंडळ उपस्थित होते. जागेअभावी प्रत्येक उपस्थिताचे नाव लिहिता आले नाही पण संस्था त्यांची आभारी आहे.



त्यानंतर सकाळी ९ ते २ या वेळेत पाठक हॉस्पिटल मिरज येथे रक्तदान शिबीर झाले. त्यात ४८ इच्छुकांपैकी ४३ जणांचे रक्तदान घेण्यात आले. त्याकामी श्री. वसंतदादा पाटील रक्तकेंद्र मिरज यांचे सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री. मनोहर शिंदे, अरुण प्रेस मिरज यांच्या शुभहस्ते झाले व प्रमुख पाहुणे म्हणून शतकवीर रक्तदाते प्रा. रवींद्र फडके यांचे मार्गदर्शन लाभले.  रक्तदान शिबीर आयोजनात सर्वश्री अमोल देशपांडे, निरंजन अन्दानी, गणेश कोळसे, उन्मेष वसगडेकर, अभिजित शिंदे, वाय. सी. कुलकर्णी  यांचे सहकार्य लाभले. दत्त भोजनालय मिरज यांचे श्री विठ्ठल नाईक व बंधू यांनी रक्तदात्यांसाठी व रक्तसंकलनकर्ते यांच्यासाठी  अल्पोपाहाराची व्यवस्था पाहिली. संस्था रक्तदात्यांचे व या सर्वांचे आभार मानते.

सायंकाळी खरे मंदिर मुक्तांगण सभागृहात , दोन वर्षांच्या खंडानंतर, वार्षिक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. प्रिया प्रभू  देशपांडे, सहयोगी प्राध्यापिका प्रतिबंधात्मक व सामाजिक वैद्यकशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, होत्या व अध्यक्षस्थानी डॉ. बी. टी. कुरणे होते. तसेच संस्थेचे सर्व ट्रस्टी व सल्लागार समिती , व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेतर्फे अहवाल सालात देवाज्ञा झालेल्या ज्ञात व अज्ञात हितचिंतकांना श्रद्धांजली वाहिली गेली. त्यानंतर डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले. दीप प्रज्वलना नंतर श्री. सत्यजीत पाठक याने वंदनगीत सादर केले. मग संस्थेतर्फे संस्थेस मदत करणाऱ्या काही सन्माननीय व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर अहवालाचे प्रकाशन झाले. डॉ. कुरणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे दर वर्षी होणारे समाजाभिमुख विषयावर भाषण. साथ रोगाने दोन वर्षे ते होऊ शकले नाही म्हणून त्याचा पुन्हा श्री गणेशा “भविष्यातील साथीचे रोग व प्रतिबंधात्मक उपाययोजना” या विषयाने करणे सांयुक्तिक ठरले. या विषयावर बोलताना डॉ. प्रभू देशपांडे यांनी प्रत्येकाने कसे जागरूक राहिले पहिले व अफवावर विश्वास न ठेवता शासनाच्या सूचना पाळाव्यात याची जाणीव करून दिली व लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले. यासाठी दृक्श्राव्य माध्यमांचा वापर केला गेला व हे भाषण संस्थेच्या youtube चानेल वर उपलब्ध आहे.

Posted in Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*