३० नोव्हेंबर संस्थेसाठी कायमच महत्त्वाचा दिवस आहे. ३० नोव्हेंबर १९८५ ही कै. डॉ. न. रा. पाठक यांची पुण्यतिथी. तसेच याच दिवशी १९९० साली वृद्धाश्रम सुरु झाला. त्यामुळे हा दिवस पाठक ट्रस्ट च्या वार्षिक अहवाल प्रकाशनाचा दिवस असतो.
डॉ. न. रा. पाठक यांच्या पुतळ्यास अभिवादन
दर वर्षीप्रमाणे सकाळी सव्वा आठ वाजता मिरज मार्केट जवळील कै. डॉ. न. रा. पाठक यांच्या पुतळ्यास अभिवादनासाठी लोक एकत्र आले होते. संस्थेचे प्रदीर्घकाळ पर्यवेक्षक पद सांभाळणारे श्री. अशोक कोळसे यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी समाजातील विभिन्न क्षेत्रात कार्यरत मंडळी उपस्थित होती.



रक्तदान शिबीर
सालाबादाप्रमाणे पाठक हॉस्पिटल मिरज येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन शतकवीर रक्तदाते प्रो. रवींद्र फडके यांचे शुभहस्ते व प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या शिबिराचे रक्तसंकलन मिरजेतील वसंतदादा पाटील रक्तकेंद्राने केले. कार्यक्रमाचे वेळी डॉ. बी. टी. कुरणे, रक्तकेंद्राच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. वैशाली पोळ यांनी रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. एकूण ३३ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले.

वार्षिक समारंभ
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वासुदेव देशिंगकर, कोल्हापूर हे होते. प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून पुण्याचे डॉ. सुधीर राशिंगकर हे लाभले होते. श्री. दीपकबाबा शिंदे, म्हैसाळ हे देखील कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.








कार्यक्रमाची सुरवात श्री. श्रीकांत सावंत यांच्या सुरेल आवाजातील सरस्वती प्रार्थनेने झाली. नंतर मंचावरील उपस्थितांनी दीप प्रज्वलन केले आणि डॉ. न. रा. पाठक, व श्री बा. रा. पाठक (संस्थेचे प्रथम अध्यक्ष) यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण केले.
संस्थाध्यक्ष डॉ. रा. न. पाठक यांनी उपस्थितांचे स्वागत केले व प्रास्ताविक मांडले.
श्री. श्रीकांत येडूरकर यांनी अध्यक्ष डॉ. वासुदेव देशिंगकर यांचा परिचय करून दिला. तर, श्री. अशोक तुळपुळे यांनी प्रमुख पाहुणे व वक्ते डॉ. सुधीर राशिंगकर यांची ओळख करून दिली. संस्थेतर्फे संस्थेचे मानद कार्यवाह डॉ. बी. टी. कुरणे यांनी तिन्ही पाहुण्यांचे स्वागत केले. श्री. दीपकबाबा शिंदे यांचे शुभहस्ते अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. तर डॉ. कुरणे यांनी डॉ. राशिंगकरांचा सत्कार केला.
यानंतर, संस्थेतर्फे श्रीमती विनय देवधर, श्रीमती मीना अनंत बेडेकर व श्री सुंदर पाठक यांचा सत्कार करण्यात आला.



डॉ. वासुदेव देशिंगकर यांनी अहवालाचे प्रकाशन केले. डॉ. बी. टी. कुरणे यांनी अहवाल वाचन केले.

कै. डॉ. न. रा. पाठक स्मृती व्याख्यान
या वर्षीचे कै. डॉ. न. रा. पाठक स्मृती व्याख्यान डॉ. सुधीर राशिंगकर यांनी दिले. त्यांचा व्याख्यानाचा विषय होता “मला भावलेले आंतरराष्ट्रीय उद्योजक” . ते स्वतः एक आत्मसिद्ध उद्योजक आहेत व त्यांनी आजवर अनेक उद्योजकांची चरित्रे लिहिली किंवा भाषांतरित केलेली आहेत. त्या चरित्रांचा अभ्यास करत असताना त्यांना भावलेले मुद्दे त्यांनी आपल्या सुश्राव्य शैलीत मांडले. आंतरराष्ट्रीय उदाहरणे देताना त्यांनी डॉ. बेन कार्सन, सॅम वॉल्टन, अकियो मोरीता, कर्नल सँडर्स व इतर यांची उदाहरणे दिली.
भारतीय उद्योजकांची उदाहरणे देताना शंतनुराव किर्लोस्कर, प्रल्हाद छाब्रिया, मुकेश अंबानी, आणि हणमंतराव गायकवाड यांची उदाहरणे दिली. त्यांनी जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे व चार्ली मंगर यांची कहाणी सांगितली. त्यांनी समारोप करताना सगळे ओंत्रप्रेनॉर कसे आत्मस्फुर्त असतात त्याबरोबर मेहनत देखील करतात हे पटवले.


डॉ. वासुदेव देशिंगकारानी डॉ. राशिंगकर यांच्या भाषणाचा आढावा घेतला व आपले अध्यक्षीय मत त्यावर नोंदवले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मिरजेच्या हृद्य आठवणींची उजळणी केली. तसेच लोकांनी कसे आत्मकेंद्रित न राहता समाजाभिमुख बनावे व आपणास जमेल तशी म्हणजे ती दरवेळी पैशाच्या रूपात असेल असे नाही तर वेळ, कौशल्य या रूपात देखील समाजास मदत करावी असे आवाहन केले.
डॉ. सुधन्वा पाठक यांनी संस्थेतर्फे आभारप्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.
आभार!
या कार्यक्रमास, तसेच सकाळपासून संध्याकाळ पर्यंत विविध कार्यक्रमात शंभराहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली. त्यामध्ये व्यावसायिक, शैक्षणिक, डॉक्टर, सामाजिक, राजकीय व पत्रकार अश्या विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. आपले संस्थेवरील हे प्रेम आमचा हुरूप वाढवणारे आहे. सर्वांचे आभार.
सर्व ३३ रक्तदात्यांना आमच्यातर्फे धन्यवाद!
रक्तदान शिबीर संयोजनासाठी सर्वश्री निरंजन अंदानी, गणेश कोळसे,अभिजित शिंदे आणि विठ्ठल नाईक यांचे आभार, रक्तसंकलनाचे बद्दल श्री. वसंतदादा पाटील रक्त केंद्राचे आभार.
अभिनव संस्थेचे श्री आबासाहेब कागवाडे, मिरज विद्यार्थी संघाचे श्री अशोक तुळपुळे, श्री श्रीकांत येडूरकर या तिघांचे आभार. सावंत डेकोरेटर्स यांचे ध्वनिव्यवस्थेसाठी आभार. सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल मिरज विद्यार्थी संघाचे आभार.
संस्थेचे सर्व दाते यांचे आभार.
या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वाचे पुनश्च आभार. लोभ असाच राहू दे!
Leave a Reply