गेल्या रविवारी दिनांक १७-३-२४ रोजी आमच्या वृद्धाश्रमातील प्रवेशित आजी श्रीमती सरोजिनी अरुण कुलकर्णी यांचे वयाच्या ७६व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. संस्थेतर्फे तसेच सर्व ट्रस्टी, प्रवेशित, कार्यकारी मंडळ व कर्मचारी यांच्यातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. संस्थेत त्यांच्यासाठी दि. १९-३-२४ रोजी श्रद्धांजली सभेचे नियोजन केलेले होते. त्या सभेमध्ये त्यांच्या हृद्य स्मृतींना संस्थेच्या पदाधिकारी, प्रवेशित व कर्मचारी यांनी उजाळा दिला त्यातून माहिती संकलित करून हा लेख लिहिलेला आहे.
पार्श्वभूमी
१९९९ सालापर्यंत श्रीमती सरोजिनी कुलकर्णी या सांगली येथे स्थित होत्या. त्यांचे सर्व कुटुंबीय उच्चशिक्षित आहेत. डॉक्टर, इंजिनियर व व्यावसायिक अश्या सर्व क्षेत्रात हे कुटुंब स्थिरस्थावर आहे. पण त्यांचे पतीच्या दुःखद निधनानंतर त्यांना आपण एकटे न राहता समाजासाठी काहीतरी करावे असे वाटू लागले होते. तसे त्यांच्या कुटुंबियांच्यात त्यांना आधार नक्कीच मिळाला असता पण त्यांची आपण काहीतरी समाजसेवा करावी ही ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांचे दीर डॉ. श्रीराम कुलकर्णी हे पनवेल येथे प्रख्यात फिजिशन आहेत. ते मिरज मेडिकल कॉलेज च्या १९७४बॅच च्या स्नेहमेळाव्याच्या निमित्याने पाठक ट्रस्ट च्या डॉ. सौ. अंजली पाठक याना एकदा भेटले व त्यात त्यांनी सांगितले “माझ्या वहिनींना तुमच्या आश्रमात काम करावयास आवडेल, त्यांच्या योग्य तेथे एखादा जॉब आहे का?”. मग त्यांना रीतसर अर्ज करण्यास सांगितलं गेलं व त्याप्रमाणे त्यांची मुलाखत देखील झाली. त्यांना हे देखील स्पष्ट करण्यात आले की मुलांच्याकडून त्यांच्या कामाचा फीडबॅक देखील घेतला जाईल व सुरुवातीचे काही महिने हे प्रोबेशन प्रमाणे असतील. अशाप्रकारे १९९९ साली त्यांना पाठक बालकाश्रम येथे कामावर रुजू करण्यात आले.
गृहमाता म्हणून कार्य
१९९९ ते २०१८ ही वीस वर्षे कुलकर्णी बाईंनी ( श्रीमती कुलकर्णी याना संस्थेतील मुले प्रेमाने व आदराने कुलकर्णी बाई म्हणत) पाठक बालकाश्रमात गृहमाता म्हणून घालवली. आश्रमाच्या इमारतीतच त्यांची एक छोटी खोली होती व दिवसभर त्या आश्रमात घालवीत. गणपती ( महालक्ष्मी-गौरीचा दिवस ) सोडल्यास शक्यतो त्या रजेवर कधी नव्हत्या. इतका पूर्ण वेळ संस्थेत घालवल्यामुळे मुलांच्यावर सतत संस्कार करणारी ती व्यक्ती होती. मुले टीव्हीवर कोणत्या प्रकारचे कार्यक्रम पाहतायत किती वेळ पाहतायत यावर देखील त्यांचे लक्ष असे. मुलांच्या दोन बॅचेस शाळेला जात सकाळी ७ वाजता व दुपारी ११ वाजता. या शाळेला जाणाऱ्या मुलांचे डबे सहकर्मचाऱ्यांच्या कडून तयार करवणे. त्यांचे गणवेश स्वच्छ न चुरगळलेले आहेत याची खातरजमा करणे. इतक्या बारीकसारीक गोष्टी देखील त्या बघत. तेव्हा संस्थेचे अधीक्षक श्री. अशोक कोळसे यांना त्या दैनिक कामकाजात देखील मदत करत. दर मंगळवारी ट्रस्टी व कर्मचारी यांची आठवड्याची मीटिंग होते. त्या मीटिंग मध्ये मुलांच्या वर्तणुकीबाबत व आरोग्याबाबत ट्रस्टीना त्या प्रगती सांगत. मुलांच्या पोषक आहराबरोबर आहारातील पदार्थात वैविध्य राहील यांच्याकडे देखील त्या पाहत. संस्थेतील मुली विशेषतः कॉलेज ला जाणाऱ्या मोठ्या मुलींना त्यांचा खूप आधार होता. त्या व्यवस्थित अभ्यास करायत का? संस्थेच्या वेळेबाबत वक्तशीर आहेत का? याचीही त्या काळजी घेत.
संस्थेतील कार्याबरोबरच त्यांना मराठी साहित्य वाचनाची आवड होती. आवडत्या पुस्तकातून त्या टिपणे काढत. दरवर्षी त्या मिरजेची वसंत व्याख्यानमाला न चुकता ऐकत. सोबत एक वही घेऊन जात व भाषणाचे टिपण काढत. वृद्धाश्रमातील काही महिलांना त्या व्याख्यानमालेस बरोबर घेऊन जात. जे वृद्ध येऊ शकले नाहीत त्यांना त्या भाषणाचा सारांश कळवत. गेल्या पंचवीस वर्षातील संस्थेच्या वार्षिक अहवालात जो कै. डॉ. न. रा. पाठक स्मृती व्याख्यानाचा गोषवारा येई, तो त्यांच्या टिपणातून बनवलेला होता.
२०१८मध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतली व पुढील आयुष्य घरी परत न जाता वृद्धाश्रमात घालवण्याचे ठरवले.
वृद्धाश्रमात
२०१८ मध्ये त्यांनी पाठक वृद्धाश्रमात प्रवेश घेतला. त्यांनी स्पष्ट केले की “इतर प्रवेशीतांप्रमाणे मी राहणार, मला कोणतीही जबाबदारी नको कारण प्रकृतीने जमेल असे सांगता येईल असे नाही. संस्थेची फी मी माझ्या सेविंग्स मधून मी स्वतः भरेन”. अशाप्रकारे त्यांनी आपले रिटायर्ड आयुष्य वृद्धाश्रमात व्यतीत करण्यास सुरुवात केली.
त्यांच्याकडे आता कोणतीही संस्थेची अधिकृत जबाबदारी नव्हती, तरीही त्यांनी संस्थेच्या संचालकांना व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना व मदत करत. संस्थेच्या सर्व वार्षिक कार्यक्रमांत २६ जानेवारी, महिलादिन, १५ ऑगस्ट, गणपती, दिवाळी,व ३० नोव्हेंबर रोजी संयोजनात त्यांचा स्वयंसेवक म्हणून वाटा असे. त्यांच्याबद्दल आठवणी सांगताना एका आजीनी सांगितले की “मी दूर गावातून येथे आले. इथली मला काहीच माहिती नव्हती पण बँक खाते उघडणे, इतर औषधे इ. खरेदी यात कुलकर्णी बाईंनी मला मदत केली.” दुसऱ्या आजीनी सांगितले ” मधल्या आजारपणात अशक्तपणामुळे मला वेणी घालायला जोर पोहचत नव्हता तेव्हा बाईंनी माझी वेणी घातली.” सत्यजित पाठक आमच्या संस्थेचा माजी प्रवेशित , तो आता संस्थेतून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभा राहतो आहे, त्यास संस्थेतून बाहेर पडल्यावर कुलकर्णी बाईनी व त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला केलेली मदत उपयोगी पडली आहे. त्यानेदेखील स्वतःचे विचार मांडताना त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे अशा छोट्या छोट्या कृतीतून देखील कोणतेही पद/जबाबदारी नसताना देखील आपण दुसऱ्याना उपयोगी पडू शकतो याचे उदाहरण त्यांनी दिलेले आहे.
स्फूर्ती
परसेवेचा वसा त्यांनी मृत्यूपश्चात देखील जपला असे म्हणता येईल कारण कुलकर्णी कुटुंबीयांनी कुलकर्णी बाईंच्या इच्छेप्रमाणे त्यांचा मृतदेह वैद्यकीय संशोधनासाठी शासकीय वैद्यकीय माहाविद्यालय मिरज येथे देहदान म्हणून सुपूर्द केला.
त्यांचे गेल्या पंचवीस वर्षात पाठक ट्रस्ट या संस्थेसाठी केलेले कार्य गाजावाजा न करता निस्वार्थीपणे समाजसेवा कशी करावी याचा उत्तम परिपाठ आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकास त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संस्थेतील माजी प्रवेशित मुली खूप दुरून त्यांच्या अंत्यदर्शनास आल्या. त्या मुली आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, संसारात स्थिर आहेत. त्यातील काही विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्या आवर्जून आल्या यातच त्यांचे कुलकर्णी बाईंच्या बद्दलचे ऋणानुबंध व त्यांनी केलेल्या संस्काराची मुलींनी ठेवलेली जाण हे दोन्ही दिसतात.
देव त्यांना सद्गती देवो ही प्रार्थना. ओम शांती.
पाठक अनाथाश्रम ही संस्था गेली आठ दशके सतत कार्य करते, ट्रस्ट गेली सहा दशके यामागे केवळ संस्थापक संचालक मंडळच नव्हे तर कुलकर्णी बाई यांच्यासारख्या निस्पृह सेवा देणाऱ्या संस्थेच्या अनेक स्वयंसेवकांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. त्यांचा सेवाभाव, प्रामाणिकपणा व सचोटी संस्थेच्या आताच्या व भविष्यात येणाऱ्या प्रत्येक सेवकास अनुकरणीय आहे.
डॉ. सुधन्वा रामचंद्र पाठक , ट्रस्टी , पाठक ट्रस्ट , दि. २४-३-२०२४
भावपूर्ण आदरांजली